पुणे – सोसायटीमधील बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिणे व पार्किंगमधील चारचाकी गाडी चोरी केली. ही घटना 9 एप्रिल ते 27 मे या कालावधीत वडकीगाव येथील नंदीनी आर्चिंड सोसाटीत घडली.
याप्रकरणी, चोरी झालेल्या घरमालकाचे मित्र शशांक रमापती मिश्रा (वय.35,रा. महंमदवाडी उंड्री) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिश्रा यांचे मित्र शशिकांत जामवंत जयस्वाल यांची ही सदनिका आहे. त्यांच्या मुळगावी जयपुर येथे नातेवाईक आजारी असल्यामुळे ते गावी गेले होते. त्यामुळे तेथील त्यांची सदनिका बंद होती. दरम्यान चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दोन तोळे सोन्याचे दागिणे व पार्किंगमधीच चारचाकी गाडी चोरी करून पळ काढला.
घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे फिर्यादींना संशय आला. त्यामुळे त्यांनी पहाणी केली तेव्हा चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यांनंतर पोलिसांनी पाहणी करून गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हंबीर करत आहेत.