करोना पॉझिटिव्ह, आयसीयूतील रुग्णांना लस नको

केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिले निर्देश; गर्भवती असल्याची शक्यता असणाऱ्यांनाही लस नाही

पुणे  – कोणाला लस द्यायची आणि नाही, याबाबत केंद्र सरकारने निर्देश जारी केले असून, करोना पॉझिटिव्ह असलेल्या, ज्याला प्लाझ्मा देऊन आठ आठवडे पूर्ण झाले नाहीत अशा नागरिकांना लस देऊ नये असे या निर्देशात म्हटले आहे. याशिवाय आणखीही निर्देश जारी केले असून, केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबतचे पत्र सर्व राज्यांना गुरूवारी दिले आहे.

 

 

या आधी गर्भवती महिला, 18 वर्षांच्या आतील बालके, ज्यांना कोणती ऍलर्जी आहे अशा नागरिकांना लस देऊ नये हे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते. मात्र आता त्यामध्ये आणखीही गोष्टींची भर पडली असून, ज्यांना करोनासदृश लक्षणे आहेत, ज्यांना प्लाझ्मा देऊन आठवड्यांचा कालावधी उलटला नाही, करोनासह अन्य कारणांमुळे रुग्ण गंभीर आजारी होऊन अतिदक्षता विभागात उपचार झाले आहेत, अशा रुग्णांना लस देऊ नये, असेही या निर्देशात म्हटले आहे.

 

 

प्लाझ्मा देऊन आठ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी झाला आहे, गंभीर आजारी आहे, अतिदक्षता विभागात उपचार घेऊन काहीच दिवस झाले आहेत, तसेच गर्भवती असल्याची शक्यता असलेल्यांना, ज्यांना एखाद्या अन्य इंजेक्शन, औषधे, फार्मसी उत्पादने यांची रिऍक्शन होत असल्याचा इतिहास असल्यास, किंवा करोना लसीच्या पहिल्या डोसची रिऍक्शन आल्यास दुसरा डोस देऊ नये, असेही यात नमूद केले आहे.

 

 

ज्या रुग्णांना रक्तस्राव होण्याचा इतिहास आहे किंवा रक्त गोठण्याचा आजार जसे क्लोटिंग फॅक्टर डिफिसिएंशी, प्लेटलेट डिसॉर्डर आहे त्यांना काळजीपूर्वक लसीकरण करण्यात यावे, असे म्हटले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्याला लस देण्याआधी या संदर्भातील प्रश्न विचारले जातील आणि त्यांना या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

 

 

या रुग्णांनाही देणार लस

  • ह्रदय, मेंदु, फुफ्फुस, चयापचय, किडनी आणि दुर्धर (कॅन्सरविषयक) आजारांचा इतिहास असलेल्या रुग्णांना ही लस देण्यात येणार आहे.
  • करोना होऊन बरे झालेले
  • प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, एचआयव्हीग्रस्त, इम्युनोसप्रेशन औषधे घेणाऱ्या व्यक्ती

ज्या रुग्णांना प्लाझ्मा दिलेला असेल व त्याला आठ आठवडे झालेले नसतील तर त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस देण्यात येणार नाही. याबाबतची केंद्राने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे मिळाली आहेत.

– डॉ. वैशाली जाधव, महापालिका लसीकरण प्रमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.