पुणे – येरवडा मध्यवर्ती कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, तिन्ही कैद्यांचे मृत्यू हे वेगवेगळ्या आजारपणातून झाले असल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संदेश अनिल गोंडेकर (वय 26, रा. डोणजे), शाहरूख बाबू शेख (वय 29, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय 32, रा. मोरगाव, बारामती) अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. गोंडेकर यास 2018 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमितपणे जात होते. दि.31 डिसेंबर रोजी त्याचे वडील त्यास भेटण्यासाठी कारागृहात गेले, त्यावेळी त्यांना हवेली पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. या घटनेस कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदविला. त्यानंतर ारागृह अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू “लिव्हर सोरायसीस’ मुळे झाल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ या दोन्ही कैद्यांनादेखील विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला. त्याबाबत संबंधितांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यांमार्फत कळविले आहे.
वैद्यकीय पथकाकडून तपासणी
याविषयी येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम म्हणाले, “मृत्यू झालेल्या तिन्ही कैद्यांना विविध प्रकारचे आजार होते. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे. संदेश गोंडेकर याच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूबाबत शंका होती. त्याबाबत डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांना मृत्यूचे कारण सांगण्यात आले आहे.