इस्लामपूर (विनोद मोहिते/प्रतिनिधी) –इस्लामपुरात रविवारी रात्री झालेल्या खुनाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. दारू पिऊन पडणे एकाच्या जीवावर बेतले.खिशातील पैसे चोरीच्या उद्देशाने तिघांनी सेन्ट्रीग कामगार राजेश सुभाष काळे (वय३५) याला निर्जन स्थळी नेत कायमचे संपवले. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा गुन्हा उघडकीस आला. चोरीच्या उद्देशाने एकाचा हाकनाक बळी गेला.
याप्रकरणी पोलिसांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार संदीप शिवाजी कुटे (वय २२ रा.लोणार गल्ली- इस्लामपूर) ऋतिक दिनकर महापुरे वय २१ रा. खांबे मळा इस्लामपूर ) अनिल गणेश राठोड ( वय २० रा.रा.लोणार गल्ली- इस्लामपूर मूळ गाव ऐणापूर ता. विजापूर ) या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.
इस्लामपूर शहराच्या पश्चिमेला कापूसखेड रस्त्यावरील एका टेकडावर रविवारी रात्री उशिरा राजेश सुभाष काळे याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. खुनानंतर पोलिसांनी आव्हानात्मक पद्धतीने तपास करत आरोपींना जेरबंद केले. डोक्यात दगड घालून काळे याचा खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याची पँट काढुन फेकली होती. यामुळे हा निर्घृणपणे केलेला खून अनैतिक संबंधातून झाल्याची शहरात चर्चा होती.त्यामुळे पोलिसांनी सर्व पातळीवर तपास सुरू केला होता.
रविवारी सकाळी राजेश काळे हा पाटण तालुक्यात एका गावाला आई सोबत गेला होता. रात्री त्यांच्या आजोळी पेठ (ता. वाळवा ) येथे आईला सोडून तो इस्लामपूर शहरात आला. रात्री उशीरा त्याने कचरे गल्ली येथील दुकानात दारू पिली होती. दुकानाच्या आवारातच तो झोपला होता. रात्री ११ वाजून तीन मिनिटांनी त्याला या तिघा मारेकर्यांनी त्याला उठवले. तिथे त्याच्या खिशातून काही पैसे काढून घेतले. त्यानंतर काही अंतरावर चालत नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट झाले होते.
पोलिसांनी याच सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तपास सुरू केला. तिघांनी राजेश याला एकाच दुचाकीवरून नेल्याचे डांगे चौकातील फुटेजमध्ये दिसले. तिथून मारेकऱ्यांनी राजेशला डांगे स्कूल जवळून कोळी मळा, टाकलाईनगर मार्गे कापुसखेड रस्त्यावर असणाऱ्या टेकडावर निर्जन स्थळी नेले. तिथे राजेश याच्या खिशातून पैसे काढुन घेतले. तेव्हा राजेश याने प्रतिकार केला.राजेश हा घडलेल्या प्रकारची तक्रार करेल. या भीतीने त्याला तिघांनी दगडाने ठेचून ठार मारले.
खुनानंतर तिघांनी कापुसखेड नाका, मोमीन मोहल्ला, शिराळा नाका मार्गावरून दुचाकी वरून पलायन केले. मुख्य संशयीत कुटे याने ऋतिक महापुरे याला घरी सोडले. त्यानंतर अनिल राठोड सह दोघे लोणार गल्लीत आपल्या राहत्या घरी गेले. त्यांनी सोबत मृत राजेशचा मोबाईल नेला होता. सकाळी मोबाईल सुरू असल्याने पोलिसांनी मोबाईल लोकेशन तपासल्यावर ते उरण परिसरात दाखवले. तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी दुचाकी कुटे याच्या घरी असल्याची मिळून आली.त्यामुळे पोलिसांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार संदीप शिवाजी कुटे याला ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला.
दारू दुकान परिसर ते कापुसखेड नाका येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये दिसणारे मोरेकरी वर्णनावरून एकच होते. याच दरम्यान त्यांनी खून केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे त्या तिघांनी खून केल्याचा संशय होता. ते तिघे पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आले होते. चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांच्या समोर मारेकर्यांना पकडण्याचे आव्हान होते.
गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीला नंबर प्लेट नव्हती. तर या दुचाकीच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या रेडियम च्या पिवळ्या पट्ट्या वरून पोलिसांनी गाडीचा तपास सुरू केला. अन् तपासात ही गाडी कुटे यांची असल्याचे समोर आले. कुटे हा रेकॉर्ड वरचा गुंड असल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रकार उघडकीस आला.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मनीषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, भानुदास निंबोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक ठोंबरे,शरद जाधव,पोलीस नाईक अरुण पाटील, अमोल चव्हाण प्रशांत देसाई, सचिन यादव,अलमगीर लतीफ, गणेश शेळके,उमेश राजगे, योगेश जाधव यांनी तपास कामात सहभाग घेतला.
मारेकरी संदीप कुटे रेकॉर्डवरील गुन्हेगार
खुनातील मुख्य संशयित आरोपी संदीप कुटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर दुखापत करणे, घरफोडी,जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत. तर त्याच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव आहे. स्थानबद्द गुंड रव्या खोत याच्या टोळीतील आहे. चोरीच्या सवयीतून निष्पाप राजेश याचा हकनाक बळी गेला.मारेकरी आणि राजेश यांचा कुठे संबंध आला नव्हता तर कधी ओळखही नव्हती.
सीसीटीव्ही कॅमेऱ्या मुळे हा गुन्हा उघडकीस
इस्लामपूर शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मुळे हा गुन्हा उघडकीस आला. खुनानंतर मारेकरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले तपासात सीसीटीव्ही उपयुक्त ठरले.