धक्कादायक! जामखेड शहरात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

शहरातील एका डॉक्टरसह दोन जणांना कोरोनाची लागण

जामखेड (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गापासून गेले काही महिन्यापासून सुरक्षित असणार्‍या कोरोनमुक्त असणाऱ्या जामखेड शहरात कोरोनाने पुन्हा एन्ट्री केली असून शहरातील एका खाजगी डॉक्टरांसह एकुण दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकच खळबळ उडाली आहे.यापैकी शहरातील जी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात आली आसल्याने प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.शहरात बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे़. दरम्यान शहरातील एक मोठ्या बँकेच्या शाखाधिकाऱ्यांचाही स्वॅब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शहरातील खासगी हॉस्पीटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या आजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी नगर येथील खाजगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली होती. तर शहरातील बीड रोडवर रहाणार्‍या एका व्यक्ती आजारी असल्याने त्या व्यक्तीने देखील नगर येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली होती. आज दि. 29 रोजी या दोन्ही रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे दोन्ही व्यक्ती शहरात रहात आहेत. त्यामुळे तब्बल तीन महीन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरात पुन्हा कोरोनाने एन्ट्री केली आहे.

तसेच काल देखील फक्राबाद येथील एक व्यक्ती व बाहेरगावी रहात आसलेल्या मात्र जामखेड शहरातील स्थानिक पत्ता आसलेल्या दोन अशा एकुण तीन जणांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे सध्या दोन दिवसात शहरासह तालुक्यातील एकुण पाच व्यक्ती कोरोना बाधित अढळुन आल्या आहेत. आज डॉक्टरांसह निघालेल्या दोन व्यक्ती सध्या नगर येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. पॉझिटिव्ह डॉक्टर हे पुण्याहून आल्या नंतर कॉरंटाईन झाले होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे हॉस्पिटल देखील बंद होते. मात्र शहरातील जी व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. ती अनेक व्यक्तींच्या संपर्कात आली असल्याने प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

सध्या लॉकडाऊन चा विचार नसला तरी नागरीकांनी जर नियम पाळले नाहीत तर मात्र कडक लॉकडाउन करण्यात येईल, असे देखील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी, असे देखिल ते म्हणाले. मुंबई-पुण्यावरून येणाऱ्या वाढत्या लोकांमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.