पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधाऱ्यांचे उच्छाद आता नवनवी नवलाई जन्माला घालत आहे. उद्यान विभागात काल (मंगळवारी) ऑनलाइन पद्धतीने निविदा उघडल्या जात असताना आपल्या मर्जीतील ठेकेदाराला काम न मिळाल्याने महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याच्या मुलाने थेट उद्यान विभागाचा लॅपटॉपच पळविला. मंगळवारी दडपलेला हा प्रकार बुधवारी समोर आल्यानंतर पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने नोव्हेंबर-डिसेंबर 2019 रोजी उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीची निविदा राबविली होती. 23 उद्यानांसाठी राबविण्यात आलेल्या निविदांपैकी चार निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळावे यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पालिकेच्या पातळीवर मोठे राजकारणही रंगले होते. काही ठेकेदारांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आयुक्तांकडे तक्रारीही केल्या होत्या.
मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही तर त्यानंतर अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे या निविदा उघडण्यात आल्या नव्हत्या.
मंगळवारी (दि.28) दुपारच्या सुमारास या निविदा उघडण्यास सुरुवात करण्यात आली. निविदा प्रक्रियेत सहभागी ठेकेदारांसमोर ऑनलाइन पद्धतीने काम सुरू करण्यात आले.
निविदा उघडण्यास सुरुवात होताच महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याचा मुलगा या ठिकाणी आला. आपल्या ठेकेदाराला काम मिळत नसल्याचे लक्षात येताच थेट या मुलाने टेंडर लिपिकासमोरील लॅपटॉप खेचून घेतला आणि धूम ठोकली. काय चालले आहे हे कोणाच्याच लक्षात आले नाही. मात्र महापालिकेच्या मुख्य इमारतीत या असा निरोप या मुलाने अधिकाऱ्यांना दिला आणि त्यानंतर लॅपटॉपसह संबंधित पदाधिकाऱ्याचा मुलगा पालिकेच्या थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचला.
दरम्यान, उद्यान विभागाचे काही कर्मचारी व अधिकारी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील चौथ्या मजल्यावर पोहोचले. याठिकाणी काहीवेळ चर्चा झाल्यानंतर ही संपूर्ण “जत्रा’ महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थापत्य उद्यान विभागामध्ये पोहोचली. चर्चेअंती निविदा पुन्हा उघडल्या जातील, असा निर्णय घेतला. थोड्याच वेळात हा सर्व प्रकार निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या ठेकेदारांच्या लक्षात आले. यानंतर तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत निविदा पुन्हा उघडल्या जातील, असा निरोप धाडण्यात आला.
पहिलीच घटना
निविदा प्रक्रियेत यापूर्वीही अनेक घडामोडी घडल्या असल्या तरी थेट लॅपटॉप पळवून नेण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे काही ठेकेदारांनी सांगितले. पदाधिकाऱ्यांसोबतच आता मुलांचाही हस्तक्षेप वाढल्याने काम करायचे की नाही? याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया काहीजणांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होती. त्यासाठी आम्ही लॅपटॉप घेऊन आलो होतो. निविदा प्रक्रिया उघडताना कोणताही गोंधळ झाला नाही.
– दत्तात्रय गायकवाड, अधीक्षक, उद्यान विभाग.