नवी दिल्ली : केरळमध्ये गर्भवती हत्तीणीचा स्फोटकांनी भरलेले अननस खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्याच्यानंतर गेल्या ३ दिवसांत छत्तीसगडमध्ये ३ हत्तींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या ३ हत्तींपैकी एक हत्तीण २० महिन्यांची गर्भवती होती असे सांगण्यात आले आहे. या हत्तींच्या मृत्यूचे खरं कारण अजून समोर आले नसले तरीही वन अधिकाऱ्यांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मंगळवारी सुरजपूर जिल्ह्यात वन अधिकाऱ्यांना एका हत्तीचा मृतदेह सापडला होता. ही हत्तीण गर्भवती असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. यानंतर बुधवारी याच भागात आणखी एका हत्तीचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडला. यानंतर गुरुवारी बलरामपूर जिल्ह्यातील गोपाळपूर भागात वन अधिकाऱ्यांना आणखी एक हत्ती मृताअवस्थेत आढळला.
सध्या सर्व हत्तींचे शवविच्छेदन सुरु आहे. प्रथमदर्शनी हे सर्व हत्ती सदृढ अवस्थेत दिसत होते. त्यामुळे यांच्यावर विषप्रयोग करुन त्यांना मारण्यात आलं असावं असा अंदाज वन अधिकारी अरुण पांडे यांनी व्यक्त केला. हत्तींनी जंगलात ज्या ठिकाणी पाणी प्यायले त्या पाण्याचे काही नमुने वन विभागाने तपासासाठी पाठवले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून माणूस आणि हत्ती यांच्यात अनेकदा संघर्ष झाल्याच्या घटना छत्तीसगडमध्ये समोर आल्या होत्या. केरळमधील घटनेनंतर सर्व देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे छत्तीसगडमधील हत्तीच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते हे पाहणे गरजेचं आहे.