नवी दिल्ली : देशात सध्या हिंदुत्व आणि हिंदूंचा मुद्दा चांगलाच जोर धरत असल्याचे दिसत आहे. कारण झारखंडच्या धनबादमध्ये एका युवकाला भाजपा कार्यकर्त्यांकडून जबरदस्तीने ‘जय श्री राम’च्या घोषणा द्यायल्या लावत मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्याला उठाबशा करायला लावत थुंकी चाटण्यास भाग पाडले. धक्कादायक म्हणजे ही घटना भाजपा खासदार पीएन सिंह, भाजपा आमदार राज सिन्हा आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, शुक्रवारी भाजपाचे कार्यकर्ते धनबादमधील गांधी चौकात या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीबद्दल निषेध व्यक्त करत होते. त्यांच्या निषेधादरम्यान, एकाने झारखंड भाजपाचे प्रमुख दिपक प्रकाश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळे संतापलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी त्या मुस्लीम व्यक्तीला बेदम मारहाण केली. यावेळी वाहतूक पोलीस देखील तिथे उपस्थित होते, परंतु त्यांनी त्या व्यक्तीला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर ती व्यक्ती घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान, या घटनेचा आणि मारहाणीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
मुस्लिम युवक को बीच सड़क पर धरना पर बैठे भाजपा कार्यकर्ताओं ने पीटा,सड़क पर थूक कर चाटने को कहा और मुस्लिम युवक से जय श्री राम का नारा जबरन लगवाया गया#झारखंड के धनबाद का मामला। युवक ने ऐसा क्या बोला की भाजपाई पिटाई कर दिए?@HemantSorenJMM@dhanbadpolice
pic.twitter.com/ShbbUUqt7F— Sanjay srivastava (@IAm_Sanjaysri) January 7, 2022
या घटनेची दखल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी देखील घेतली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्वीटरवरून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सामाजिक सलोखा कुणालाही बिघडवू देणार नाही आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. पीडित व्यक्तीचा भाऊ रेहान याने एफआयआर दाखल केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांच्या घरी कारवाई केली आणि चौघांना अटक केली. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनोज स्वरगियरी यांनी सांगितले.
याप्रकरणी, भाजपा नेते सीपी सिंग म्हणाले की, “पक्ष या प्रकरणाची चौकशी करेल आणि हल्लेखोर हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत का याचा तपास करेल. ते पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने कार्यकर्त्यांना पीडित व्यक्तीला मारहाण करण्यास सांगितले नाही,” असेही त्यांनी सांगितले.