नवी दिल्ली : जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चीन, दक्षिण कोरियाप्रमाणे युरोपातील इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात असून, मृत्यूचे प्रमाणही इथे जास्त असल्याचे समोर आले आहे.
शुक्रवारी 24 तासात इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 250 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्या देशांमध्ये एकाच दिवसात इतक्या लोकांचा मृत्यू होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार इटलीमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 1,266 जणांचा मृत्यू झाला आहे.
चीननंतर आता युरोप कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमुख केंद्र बनला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 5 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतार्यंत कोरोनामुळे कर्नाटक आणि दिल्ली या दोन राज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 80 पेक्षा जास्त आहे. चीनपेक्षा आता युरोपमध्ये रोजच्या रोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरसवर अजूनही लस बनवता आलेली नाही. वैज्ञानिकांना ही लस बनण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागू शकतात.