नाशिक :- पुणे-शास्त्रीनगर येथे शिवशाही बस पेटण्याची घटना ताजी असतानाच ( Shivshahi bus caught fire ) आज पुन्हा एकदा शिवशाहीला आग लागली. आज सकाळी नाशिक-पुणे मार्गावर सिन्नरजवळ ही दुर्घटना घडली. दोन दिवसांमधील ही दुसरी घटना आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस नाशिकहून पुण्याच्या दिशेने जात होती. सकाळी 8 च्या सुमारास सिन्नर येथील माळवाडी शिवारात बस आली. त्यानंतर ती संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही बस माळवाडी शिवाराजवळ आली असता गाडीतून मोठ्या प्रमाणात धूर येताना दिसला. त्यामुळे चालकाने तत्काळ बस रिकामी केली. या बसमध्ये 45 प्रवासी होते.
रस्त्याच्या बाजूला बस उभी केल्यानंतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. बसमधून प्रवासी उतरताच काही वेळातच बस पूर्णपणे पेटली. यामुळे स्थानिकांनी तेथे मोठी गर्दी केली. स्थानिकांकडून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीने उग्र रूप धारण केले. ही आग विझवण्यासाठी सिन्नर नगर परिषद आणि सिन्नर एमआयडीसीचे प्रत्येकी एक अग्निशमन दल मागवण्यात आले. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. पुढील तपास सुरू आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Pune : येरवड्यात शिवशाही बस खाक ! अग्निशमन दलाच्या मार्गात रस्त्यातील दगडांचा अडथळा
दरम्यान, एक दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी पुणे शहरात शिवशाही बसला आग लागण्याची घटना घडली होती. ही बस यवतमाळहून पुण्याकडे जात असताना येरवड्यातील शास्त्री चौकात सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास पेट घेतला होता. या दुर्घटनेतून 42 प्रवासी सुखरूप बचावले होते.