मुंबई – महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने एका 26 वर्षीय इसमाला बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटद्वारे 27 कोटींहून अधिक रकमेच्या परताव्याची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. बनावट पावत्या सादर करून त्याने ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
जीएसटी विभागाने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणाऱ्या फसव्या दाव्यांच्या विरोधात विशेष मोहींम हाती घेतली आहे. त्यात हा प्रकार उघड झाला आहे. कंपन्यांना बोगस बिले देऊन हा परतवा मिळवून देण्यासाठी सदर इसम क्रियाशिल होता.
त्याने 238 कोटींहून अधिक बोगस बिले सादर केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.या कंपन्यांनी 34 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला आणि 27.20 कोटी रुपयांच्या फसव्या रिफंडचा दावा केला होता. या कंपन्यांच्या ऑपरेशनमध्ये अन्य कटकारस्थाने शोधण्यासाठी तपास सुरू आहे,असे जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता किंवा जीएसटी भरल्याशिवाय एखाद्या संस्थेद्वारे जीएसटी चलन तयार केले जाते तेव्हा त्यांना बनावट म्हटले जाते.