संतोष पवार
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद खेचत आ. महेश शिंदेंना रोखण्यासाठी शशिकांत शिंदेंची रणनीती
सातारा – कोरेगाव- खटाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदे यांना रोखण्यासाठी आक्रमक रणनिती आखली आहे. याचा प्रत्यय जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत आला. महेश शिंदे यांच्या खटाव गावातील प्रदीप विधाते यांना उपाध्यक्षपद खेचून आणण्यात शशिकांत शिंदे यशस्वी झाले. याशिवाय कोरेगाव, खटाव पंचायत समितीवर आपले निर्विवाद वर्चस्व अबाधित ठेवत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही मिळाल्याने शशिकांत शिंदे यांचा गट पुन्हा चार्ज झाला असून आ. महेश शिंदे यांच्यापुढे हे आव्हान ठरणार आहे.
सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्दस्त करण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने जोरदार प्रयत्न केले. माजी खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात दोन्ही कॉंग्रेसला मोठी गळती लागली होती. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर आली. पक्ष अडचणीत असताना शशिकांत शिंदे यांनी रात्रीचा दिवस करून पक्ष मजबूत ठेवण्यासाठी जीवाचे रान केले.
विधानसभा निवडणुकीत पक्षाने जिल्ह्यातील सगळी जबाबदारीच शिंदे यांच्यावर सोपवली होती. जिल्ह्यावर लक्ष देताना शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. पराभवाने शशिकांत शिंदे खचले नाहीत. पुन्हा जोमाने कामाला लागले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रदेश उपाध्यक्षपद व नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी शिंदे यांच्यावर सोपवली. अपयशाने खचून न जाता शशिकांत शिंदे यांनी पूर्वीप्रमाणे आपला जनता दरबार सुरु ठेवत लोकांचे प्रश्न मार्गी लावले. पंचायत समिती सभापती निवडीत कोरेगाव व खटाव पंचायत समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे ठेवून एकप्रकारे आ. महेश शिंदे यांना आपली ताकद दाखवून दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी रथी, महारथी इच्छुक असताना उपाध्यक्षपद आ. महेश शिंदे यांच्या खटाव गावातील प्रदीप विधाते यांना देऊन महेश शिंदे यांना रोखण्यासाठी एक पाऊल टाकल्याचेच बोलले जात आहे. खटाव ग्रामपंचायतीत 20 वर्षाच्या असलेल्या प्रदीप विधाते यांच्या सत्तेला महेश शिंदे यांनी सुरुंग लावला होता. त्यामुळे प्रदीप विधाते यांचा गट खचला होता. विधाते यांनी सुमारे 25 वर्षे राजकारण करताना पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेतेपद, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बॅंकेचे संचालकपद या माध्यमातून खटाव तालुक्यात मोठी फळी उभी करत शशिकांत शिंदे यांना बळ दिले होते.
शशिकांत शिंदे यांनीही आपल्या विश्वासू कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिल्याने कोरेगाव- खटाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा जोमाने कामाला लागत आहे.
शिवसेनेच आमदार महेश शिंदे यांच्याकडे आमदारकी वगळता मतदारसंघातील मोठे सत्तास्थान नाही. याशिवाय अनुभवी पदाधिकाऱ्यांची त्यांच्याकडे कमतरता आहे. याऊलट शशिकांत शिंदे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. त्यामुळे आगामी काळात आ. महेश शिंदे यांना रोखण्यासाठी शशिकांत शिंदे यांचा गट सक्रिय झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
कोरेगाव-खटावमध्ये महाविकास आघाडीला ब्रेक?
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात हे तिन्ही पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. सातारा जिल्ह्यातही काही तालुक्यात एकत्रीकरण होताना दिसत आहे. मात्र, कोरेगाव- खटाव मतदारसंघात शशिकांत शिंदे आणि आ. महेश शिंदे यांच्यातील संघर्षामुळे महाविकास आघाडीला सध्या तरी ब्रेक मिळाला असल्याचेच दिसत आहे.