इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
मंचर (प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक नीलेश ऊर्फ पप्पू येवले यांचे पुतणे शिवराज नितीन येवले याने वयाच्या 1 वर्षे 10 महिने असताना स्वत:चे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदवले आहे. विविध देशांचे ध्वज ओळखणे, पालेभाज्या, जंगली प्राणी, महाभारत आणि रामायणातील व्यक्तींचा संदर्भ आणि ओळख अचूकपणे शिवराज येवले सांगत आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये स्प्लेंडीड चाईल्ड या शीर्षकाखाली शिवराज येवले याचे नाव आणि त्याने केलेल्या गोष्टींची नोंद झाली आहे. शिवराजला सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिवराज येवले हा 1 वर्षे 10 महिन्याचा आहे. शिवराज हा अनेक इंग्रजी (ऍलोपॅथिक) औषधे, शिवकालीन किल्ले (शिवनेरी, जंजिरा, हवामहाल, लाल किल्ला, प्रतापगड), लहान मुलांची पुस्तके, इंग्रजी मुळाक्षरे, आठ रंग, फळे, पालेभाज्या, रहदारीची वाहने, पाळीव तसेच जंगली प्राणी, सर्व मानवी अवयव, महाभारत व रामायणातील व्यक्ती अशा अनेक गोष्टी ओळखणे आणि सांगणे याची नोंद आहे. तसेच शिवराज हा भारतीय इतिहासातील अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा फुले यांची छायाचित्र ओळखतो. अनेक आशियायी आणि इतर देशांचे ध्वजदेखील शिवराज अचूकपणे ओळखतो.