#शिवजयंती_विशेष : ‘शिवराय’ असे शक्तिदाता

राजा कसा असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेकडो वर्षांची गुलामी, अत्याचार, जुलमी राजवट झुगारून स्वराज्य संकल्पक वडिलांनी दिलेला वारसा समर्थपणे चालवित; स्वत:चे राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज आज प्रत्येकाचे प्रेरणास्त्रोत आहेत. लोकमाता जिजाऊ यांनी केलेल्या संस्कारामुळे बाल शिवबाच्या कर्तुत्वाला वेगवेगळे पैलू पडत गेले. प्रत्येकाच्या घरामध्ये शिवबा जन्मले पाहिजेत असे म्हटले जाते. परंतु, त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलाला जिजाऊसारखे संस्कार देणे गरजेचे आहे. महाराजांचा जीवनकाळ हा केवळ पन्नास वर्षांचा आहे. या पन्नास वर्षांमध्ये महाराजांनी जे काही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करून ठेवले आहे, ते आजही साडेतीनशे वर्षानंतर आदर्श असे आहे.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्‍ववंदिता शाहसुनोः
शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

रयतेवर होणारा अन्याय आणि चुकीच्या गोष्टींचा विरोध करीत महाराजांनी 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला. स्वराज्याची स्थापना करीत कल्याणकारी आणि रयतेच राज्य अस्तित्वात आले. ज्या राज्यामध्ये जनता सार्वभौम होती. महाराजांनी तत्कालीन परिस्थितीला अनुसरून आपले लष्करी सामर्थ्य अत्यंत दर्जात्मकपणे तयार केले होते. त्यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या तंत्राचा वापर समकालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या देशांकडून केला जातो. महाराजांच्या गनिमी काव्याचा उल्लेख सगळ्या लष्करी प्रशिक्षणाचा भाग मानला जातो. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून सर्जिकल स्ट्राईक च्या श्रेयावरून वाद होताना दिसतो. मात्र, महाराजांनी लाल महालावर केलेला हल्ला हे भारतीय इतिहासातील पहिले सर्जिकल स्ट्राईक म्हणावे लागेल! ज्या हल्ल्यामध्ये शाहिस्तेखानाची तीन बोटे कापली गेली. तानाजी मालुसरे, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, हिरोजी इंदुलकर, वीर बाजी पासलकर, जीवा महाला अशा असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.

उभ्या आयुष्यामध्ये महाराजांनी कधीही जातीपातीला आपल्या राज्यामध्ये थारा दिला नाही. अठरा पगड जातींना आणि बारा बलुतेदारांना सोबत घेऊन त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केले. सध्या महाराजांचे नाव वापरून मोठ्या प्रमाणात राजकारण केले जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यांच्या मालाला भाव नाही, त्यांना सुरक्षितता नाही. महाराजांच्या राज्यामध्ये एकाही शेतकऱ्याला कधी आत्महत्या करण्याची वेळ आली नाही. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणणारे शिवछत्रपती एकीकडे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणारे आजचे राजकारणी दुसरीकडे! असंख्य देशांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे इतिहास नाही. मात्र, आपल्याकडे प्रचंड असा प्रेरणादायी, दैदिप्यमान इतिहास आहे. पुढच्या पिढीसाठी प्रेरणा म्हणून आपल्या प्रेरकशक्ती असणाऱ्या गड किल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

महाराजांची अर्थव्यवस्था, व्यवस्थापन, न्यायव्यवस्था अत्यंत चांगली होती. कायदे अत्यंत कठोर होते. विशेषतः तात्काळ निर्णय घेऊन गुन्हेगारास योग्य ती शिक्षा दिली जात असे. सध्या उशिरा दिलेला न्याय हा नाकारलेला न्याय असतो या तत्वाप्रमाणे लाखो खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. शिवकाळामध्ये परस्त्रीला मातेसमान मानले जाई. महाराजांच्या राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य होते. समकालीन स्थितीमध्ये राज्य अस्तित्वात आहे का असा प्रश्‍न पडावा अशी स्थिती आहे. शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून लोककल्याणकारी रयतेचं राज्य निर्माण झाले. त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आजच्या तरूणाईने कार्य करणे, हेच महाराजांचे खऱ्याअर्थाने स्मरण ठरेल. कुशल प्रशासन, शौर्य, स्वाभिमान, चारित्र्य, नैतिकता, चातुर्य हे शिवरायांचे गुण आत्मसात केले पाहिजेत.

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावंतास, सिंहासनाधिश्‍वर, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय.

– श्रीकांत येरूळे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.