सातारा – भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज मेढा येथे महायुती आणि राजे समर्थकांनी विरोधकांना धडकी भरवणारे शक्तीप्रदर्शन केले.
मेढा नगरीत पदयात्रा काढून शिवेंद्रसिंहराजे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. पदयात्रेदरम्यान मेढा नगरवासियांनी बाबाराजेंचा जयघोष करत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्य देण्याचा निर्धार केला.
सातारा व जावली मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून वाडी, वस्ती आणि प्रत्येक गावात शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून तालुका पिंजून काढत आहेत. मेढा नगरीत आज झालेल्या पदयात्रेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता मेढा नगरी बाबाराजेमय झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सकाळी मेढ्याचे ग्रामदैवत सिद्धगणेश मंदिरात “श्रीं’चे दर्शन घेऊन शिवेंद्रसिंहराजे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत पदयात्रेचा शुभारंभ केला. सिद्धगणेश मंदिरापासून मेढा चौक ते महावितरण ऑफिस, बाजार चौक ते तहसीलदार ऑफिस, वेण्णा चौक ते एस.टी.डेपो, आंबेडकरनगर, गांधीनगर अशी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत माजी आ. सदाशिव सपकाळ, उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपसभापती कांतीभाई देशमुख, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, तालुका संपर्कप्रमुख रामचंद्र चिकणे, विश्वनाथ धनवडे, नगरसेवक विकास देशपांडे, धनंजय पवार, संतोष वारागडे, दत्तात्रय पवार, सुजित जवळ, फारुक शेख, दत्तात्रेय वारागडे, दीपक कदम आदी मान्यवरांसह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत राजेंचा जयघोष करण्यात आला. तसेच चौका- चौकात नागरिकांनी त्यांच उत्स्फूर्तपणे स्वागत केले. महिलांनी औक्षण व वयोवृद्ध नागरिकांनी आशीर्वाद देत शिवेंद्रसिंहराजे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मेढा आदर्शनगरी करण्याबरोबरच संपूर्ण तालुक्यात विकासाच नवे पर्व निर्माण करण्यासाठी जनतेने कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून नवा इतिहास निर्माण करावा.
आमदार या नात्याने गेली दहा वर्षे मी माझी जबाबदारी पार पाडत आहे. मी केलेल्या कामांची पोचपावती मला मतदानातुन मिळणार आहे. मेढा येथे अनेक विकासकामे मार्गी लावली असून आगामी काळात भाजप सरकारच्या पाठिंब्यावर उर्वरित विकास कामे पूर्ण करून मेढा प्रगतीपथावर नेणार आहे. जावलीचा विकास हाच माझा ध्यास असून, मी लोकांसाठी अविरत कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.