शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने आढळराव शिवसेनेतच असल्याचे सांगत एक परिपत्रक जारी केलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये माजी खासदाराला पक्षातून काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झालं होत.
आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेल्या अभिनंदनाच्या ट्विटमध्ये शिवसेना नेत्यांचा फोटो नसल्याने पक्षविरोधी कृत्याबद्दल कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र आता सेना कार्यालयांकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. सामनामध्ये आलेली बातमी अनावधानाने छापण्यात आली असून, आढळराव पाटील हे शिवसेनेचे उपनेते म्हणून पक्षात कार्यरत असल्याचे पत्रकात म्हंटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत ३९ आमदारांचे समर्थन मिळवले. गुवाहाटीला आमदारांना घेऊन गेल्यानंतर शिंदे यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिल. बंड यशस्वी करत शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला होता, यातच आढळराव पाटील यांनी देखील शिंदे यांच्या विजयाचे ट्विट केले होते.
शिवसेना की शिंदेसेना
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. यादरम्यान आधी विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, त्यानंतर एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणी द्यावी लागणार आहे. हे अधिवेशन चांगलेच गदारोळाचे होण्याची शक्यता आहे. यादरम्यान पहिल्यांदाच ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.