नगर – राज्याप्रमाणेच जिल्हा परिषदेतही शिवसेना महाविकास आघाडीतच राहणार आहे. याबदल्यात त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व एक विषय समितीचे सभापतीपद हवे आहे. आमदार शंकरराव गडाख यांचा शेतकरी क्रांतीकारी पक्ष पण सेनेसोबत असणार आहे. सेनेचे सात व गडाख यांचे पाच असे बारा सदस्य आहेत.
आज शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांची मुंबई येथे शिवालयात बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे सचिव खा.अनिल देसाई,संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर,जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे,गटनेते अनिल कराळे,काशिनाथ दाते,संदेश कार्ले,सुषमा दराडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्यांनी उपाध्यक्ष व एक विषय समिती सेनेला असावी अशी मागणी केली. गडाख यांचा शेतकरी क्रांतीकारी पक्षही आपल्या सोबत आहे. आपले सात व त्यांचे पाच असे एकूण बारा संख्याबळ झाले आहे. या बैठकीत नगर शहराच्या सध्या सुरु असलेल्या वादावरही चर्चा झाल्याचे समजते. जिल्हा परिषदेबाबत तिन्ही पक्षाचे वरिष्ठ चर्चा करून निर्णय घेतील असे या बैठकीत ठरले.