हॉटेल्सकडून सजावटीवर भर; खास मेनू आणि पार्ट्यांचे बेत
पिंपरी (प्रतिनिधी) – सरत्या वर्षाला निरोप देताना “थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशन करण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट कशा पद्धतीने सेलिब्रेट करायचे, याचे बेत आत्तापासूनच ठरू लागले आहेत. शहरातील प्रमुख हॉटेल्सकडून आकर्षक सजावटीवर भर देण्यात आला आहे. तसेच, खास मेनू आणि पार्ट्यांचे बेत
आखले आहेत.
नवीन वर्ष 2020 हे अवघ्या तीन दिवसांनी सुरू होणार आहे. त्यापूर्वी 2019 मधील शेवटचा दिवस 31 डिसेंबर हा कशा पद्धतीने साजरा करता येईल, यासाठी तरुणाईकडून आत्तापासूनच नियोजन सुरू झाले आहे. तरुणाईचा “थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याकडे असलेला वाढता कल पाहता शहरातील हॉटेल्सने देखील त्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू केली आहे. हॉटेल्सला आकर्षक अंतर्गत आणि बाह्य सजावट केली जात आहे. तसेच, थर्टी फर्स्टसाठी जेवणाचा आकर्षक मेनू निश्चित करण्यात आला आहे. त्याशिवाय, तरुणाईला थर्टी फर्स्टच्या रात्री नृत्याचा ठेका धरता यावा, यासाठी खास साऊंड सिस्टीमची व्यवस्था केलेली आहे.
वाकड, हिंजवडी आदी परिसरातील हॉटेल्समध्ये पार्ट्यांचे बेत आखण्यात आले आहेत. तेथे कुटुंबासह किंवा मित्र-मैत्रिणींसह जेवणाबरोबरच नृत्याचाही आस्वाद घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही हॉटेल्सकडून थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कपलसाठी (जोडपे) पासेस दिले जात आहे. त्याचे बुकींग सुरू झाले आहे.
हवामानाचीही मिळणार साथ
थर्टी फर्स्टला हवामानाचीही साथ मिळणार आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात घट होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. 31) आकाश मुख्यत: निरभ्र राहील. तसेच, किमान तापमानाचा पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत नोदला जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.