पणजी – गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या निवडणुकीत शिवसेना 22 जागा लढवणार आहे. त्यामुळे गोवा निवडणुकीत बहुरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.
गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
मागील निवडणुकीत शिवसेनेने 3 जागा लढवल्या. मात्र, तो पक्ष एकही जागा जिंकू शकला नव्हता. तसे असले तरी पुढील निवडणूक अधिक ताकदीने लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. गोव्यात भाजपची सत्ता आहे.
त्या पक्षाची प्रमुख लढत कॉंग्रेसशी होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षानेही आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. गोव्यात काही प्रादेशिक पक्षांचाही प्रभाव आहे. त्याशिवाय, तृणमूल कॉंग्रेसनेही प्रथमच गोव्याच्या रणधुमाळीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.