पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात शिवसेना पूर्ण ताकदीने सज्ज

गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला विश्वास

इस्लामपूर (प्रतिनिधी) – पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यात शिवसेनेचा महत्वाचा वाटा असेल. आमचे पदाधिकारी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत. सर्वांशी चांगला समन्वय साधून आहोत, असा विश्वास गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला. 

इस्लामपूर येथील मार्केटयार्ड परिसरातील शिवसेनेच्या जिल्हा पक्ष कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार अजितराव घोरपडे, संपर्क प्रमुख नितीन बानूगडे-पाटील, जिल्हा अध्यक्ष आनंदराव पवार, संजय विभूते,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष प्रतिभा शिंदे व सुवर्णा मोहिते उपस्थित होते.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. तरी तो आमचा महाविकास आघाडी अंतर्गतचा प्रश्न आहे. यावर त्या त्या परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ.

-शंभूराजे देसाई,  (गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र)

मंत्री देसाई म्हणाले,” शिक्षक व पदवीधरच्या पुणे मतदारसंघात पाचही जिल्ह्यात शिवसेनेचे पदाधिकारी अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. सर्वत्र शिवसेना, युवा सेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुका कमिटी तयार केल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी कार्यरत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य स्तरावर तिन्ही पक्षाच्या आघाडी बाबत निर्णय होतील. कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून निर्णय होईल. 

महाविकास आघाडीत समन्वय…!

महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ इस्लामपूर येथील नाट्यगृहात आयोजित मेळाव्यातील अनुपस्थिती बाबत शिवसेनेचे मंत्री ना.शंभूराजे देसाई म्हणाले, ” आज आमचा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा इस्लामपूर येथेच शिवसेना कार्यालयात होता. त्यामुळे अनुपस्थितीत होतो. आमची बैठक पूर्वी नियोजित झालेली होती. राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांचा समन्वय आहे. दररोजचा आढावा एकमेकांना दिला जात आहे. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आणू.”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.