कार्ला : एकवीरा गडावर “फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा

  • मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
  • कार्ला-वेहरगाव रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कार्ला – दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडल्यानंतर करोनामुळे मागील सहा-सात महिने घरात अडकले. एकवीरा देवी भाविक व पर्यटक पहिल्या रविवारी देवीच्या दर्शनासाठी कार्ला वेहरगाव येथे दाखल झाल्याने मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. एकवीरा गडावर रविवारी (दि. 22) दिवसभर सर्वत्र “फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले.

दिवाळी संपली असून, काही ठिकाणी शाळा सुरू होणार असल्याने त्यातच शनिवार, रविवारची सुट्‌टी व करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात घराबाहेर फिरायला निघाल्याने आज मंदिर परिसरात वर्दळ दिसून आली. “भाविकांनी आई आयलो… आई माऊलीचा उदो उदो…’ “एकवीरा माते की जय’, या नामघोषाने गडाचा परिसर दुमदुमला होता.

गेल्या सहा-सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भाविक कार्ला-वेहरगाव येथे दाखल झाल्याने परिसरातील हारफुल्ल विक्रेते, प्रसाद विक्रेते, लहान मोठे हॉटेलचालक व दुकानदार यांनी आनंद व्यक्‍त केला. करोनामुळे मंदिरे बंद झाल्याने या परिसरातील स्थानिक व्यवसायकांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेक विक्रेते मुले अन्यत्र कामाला जाऊ लागली होती.

करोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी करोनाचे सावट अजून गेलेले नाही. अनेक शहरांमध्ये करोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. याकरिता भाविक व पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिक व विक्रेते यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कार्ला मंदिराजवळ रविवारी दिवसभर “फिजिकल डिस्टन्सिंग’चे पुरते उल्लंघन झाले होते. पुढील काळात मंदिराजवळ गर्दी होणार नाही, याचे योग्य नियोजन देवस्थान प्रशासकीय समिती व पोलीस प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.