मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपनेते किरीट सोमय्यां यांना इशारा दिला आहे. सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपुर्व जामीनानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी लवकरच किरीट सोमय्यांचा ‘टॉयलेट घोटाळा’ बाहेर काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी भाजपवरसुद्दा जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामध्ये वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु असल्याचे ते बोलले आहेत. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडलंय का? असा सवालही यावेळी किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामीनावर बोलताना संजय राऊतांनी केला आहे. तसेच विक्रांतसाठी जमा केलेल्या प्रश्नांचा हिशोब द्या, याव्यतिरिक्त लवकरच किरीट सोमय्यांचा ‘टॉयलेट घोटाळा’ बाहेर काढणार असल्याचा इशारा राऊतांनी सोमय्यांना दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, उद्या जर दाऊद इब्राहिम बसला आणि महाराष्ट्रातले घोटाळे उघड करु लागला, तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार? कारण तो गुन्हेगार आहे. दाऊदने जसे दहशतवादावर बोलू नये तसे आयएनएस विक्रांत सारख्या राष्ट्रीय प्रश्नावर ज्यांनी घोटाळा केला आहे. लोकभावनेशी खेळलेले आहेत आणि जे दिलासा घोटाळ्यातून मुक्त झालेले आहेत. अशांनी दुसऱ्यांवर असे खोटे आरोप करणे बरोबर नाही. लोकं विश्वास ठेवणार नाहीत. आधी तुम्ही तुमचे हिशोब द्या. विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशांचे काय झाले? हे सांगा. असा सवाल राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, लवकरच मी या महाशयांचा एक ‘टॉयलेट घोटाळा’ बाहेर काढणार आहे. मिरा-भाईंदर महापालिका आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा ‘टॉयलेट घोटाळा’ झालाय. म्हणजे, कुठेकुठे पैसे खातात, तर विक्रांतपासून ते टॉयलेटपर्यंत. याबाबतचे सर्व कागदपत्र सुपूर्द झालेली आहे. युवा प्रतिष्ठान नावाची जी एनजीओ चालवत होते, ही लोकं. त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ केलाय. खोटी बिलं, पर्यावरणाचा ऱ्हास करुन पैसे काढले. हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. आता तुम्ही फक्त खुलासे करत बसा. या सर्व विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे. असेही ते म्हणाले आहेत.