मुंबई – सन 2018 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरस्टार यशचा ‘केजीएफ’ हा चित्रपट त्या वर्षामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला होता. चित्रपटातील त्याच्या रॉकी या भूमिकेमुळे यशचे सर्वत्र खूपच कौतुक झाले. तसेच त्याची स्टाईलही युवावर्गात ट्रेंड झाली होती. यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची चाहत्यांना उत्सुकता लागली होती.
आणि अखेर काल 14 एप्रिल रोजी ‘केजीएफ 2’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. विशेष बाब म्हणजे, हा चित्रपट 4400 स्क्रीनवर एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीला आला आहे.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तिकीट बारीवर कमाईची यशस्वी घोडदौड केली असून, अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ‘केजीएफ 2’ रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 130 कोटींचा आकडा पार केला आहे.
‘केजीएफ 2’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नील यांनी सांभाळली आहे. तर, चित्रपटात यश सोबत, संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज आणि श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत झळकले आहे.
दरम्यान, आनंदाची बातमी म्हणजे लवकरच आता ‘केजीएफ 2’ चा पुढचा भाग म्हणजेच ‘केजीएफ 3′ देखील रिलीज होणार आहे. KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाच्या तिसर्या भागाबद्दल हिंट दिली, तर दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटाविषयी अनेक पोस्ट्स पाहायला मिळत आहेत.
या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शित होणार असल्याचा दावा सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ”केजीएफ 3’ मध्ये अमेरिका-इंडोनेशियासह 16 देशांमध्ये झालेल्या गुन्ह्यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे.