भाजपबरोबरच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार

मुंबई : शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तावाटपा संदर्भात होणाऱ्या चर्चेवर शिवसेनेने बहिष्कार घातला. मंगळवारी दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीकडे शिवसेनेचा कोणताही नेता फिरकला नाही. या बैठकीस उपस्थित राहण्यास शिवसेनेने ठाम नकार कळवला.

सत्तेत फिफ्टी फिफ्टी वाटा देण्याचे आश्‍वासनच भाजपला आठवत नसेल तर अशा बैठकीचा उपयोग काय? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. पुढील पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार आहे. शिवसेनेला सत्तेत निम्मा वाटा देण्याचे कोणतेही आश्‍वासन निवडणुकीपुर्वी देण्यात आले नव्हते. तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत कोणतेही आश्‍वासन दिले नाही, असे वक्तव्य भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे शिवसेना- भारतीय जनता पक्षातील मतभेद कमालीचे ताणले गेले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गेल्या आठवबड्यात 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले होते, असे जाहीर केले. त्याच वेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाने शिवसेनेला अन्य पर्यायांचा विचार करण्यास भाग पाडू नये असा इशारा दिला होता.
मंगळवारीही राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. कारागृहात बाप असणारा दुष्यंत चौताला येथे कोणीही नाही. महाराष्ट्रात आम्ही सत्याचे राजकारण करतो. जर कोणी आम्हाला सत्तेपासून दूर ठेवणार असेल तर ते सत्याचे राजकारण म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.