पिंपरी – “स्थायी समिती बरखास्त करा’, “नही चलेगी नही चलेगी, टक्केवारी नही चलेगी’, “ना लाज ना शिष्टाचार’ अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड महापालिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडली. पारदर्शक कारभाराचा मुखवटा घालून पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर जामिनावर बाहेर असलेल्या स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
आज शिवसेनेने हातात फलक घेत पालिकेतील तिसऱ्या मजल्यावर महापौर कक्ष व स्थायी समिती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहराध्यक्ष ऍड. सचिन भोसले, योगेश बाबर, आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कार्यालयावर बुधवारी (दि. 18) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली. त्यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांसह पाच जणांना अटक झाली. त्यापैकी स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. तर इतर चौघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या ऐतिहासिक कारवाईमुळे सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विरोधक असलेले राष्ट्रवादी व शिवसेना आक्रमक झाले आहे. शिवसेनेने आंदोलन करत स्थायी समिती अध्यक्षांच्या राजीनामाची मागणी केली.
महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये भाजपने “ना भय, ना भ्रष्टाचार’ असे म्हणत सत्ता घेतली. मात्र गेली साडेचार वर्ष फक्त “ना लाज, ना शिष्टाचार’ असाच कारभार भाजपने केला असल्याची टीका यावेळी शिवसेनेने केली.