चांदखेड, (वार्ताहर) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यालयात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मुख्याध्यापक अजिनाथ ओगले यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर शिवगर्जना करत मशाल घेऊन, ढोल पथकाच्या गजरात, लेझीम खेळत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून तसेच ढोल ताशांच्या गजरात, संपूर्ण चांदखेड गावात अश्वारूढ शोभा यात्रा काढली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला मानाचा मुजरा केला. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसमवेत सर्व शिक्षकांनी पारंपारिक पद्धतीने भगवे फेटे परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन शिवाजी महाराजांचा जयघोष करीत रॅलीत सहभाग घेतला होता. ज्येष्ठ शिक्षक सत्यवान पवार, ज्येष्ठ लिपीक निलेश आवारी व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.