देहूगाव, दि. 2 – देहू नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा रसिका काळोखे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शुक्रवारी (दि.2) या रिक्त पदाकरिता निवडणूक घेण्यात आली. या पदाकरिता विहित वेळेत शितल अनिल हगवणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तर स्वीकृत सदस्यपदी अक्षदा प्रकाश हगवणे व गणेश उत्तम मोरे यांची निवड करण्यात आली.
उपनगराध्यक्षा रसिका काळोखे व स्विकृत सदस्य आनंदा काळोखे व रोहित काळोखे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉं.राजेश देशमुख यांनी दिले होते.
या निर्देशानुसार हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय असवले यांची पिठासीन अधिकारी म्हणून नोंद केली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि.2) सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली यावेळी झालेल्या बैठकीत सर्व नगरसेवक उपस्थित होते. पिठासीन अधिकारी संजय असवले यांनी ही घोषणा केली. देहू नगरपरिषदेचे डॉ. प्रशांत जाधव उपस्थित होते.