सातारा -सदनिका खरेदी प्रकरणात खंडाळा तालुक्यातील वृद्धाची फसवणूक करणाऱ्या पुणे येथील बांधकाम विकसकाला पत्नीसह शिरवळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. हे दाम्पत्य दोन वर्षापासून फरारी होते.
सुनील देवराम तोटे व कल्पना सुनील तोटे (रा. ताडगाव हिंगणघाट जि. वर्धा सध्या रा. वारजे) असे या दाम्पत्याचे नाव आहे. फिर्यादी पोपट दगडू जाधव (वय 62 रा. मिरजे ता. खंडाळा), विजय मोहिते (कडेगाव जि. सांगली) यांनी सेवानिवृत्तीनंतर तोटे यांच्या बालाजी विश्व प्रकल्पात सदनिका खरेदी केली होती. या दोघांकडून अनुक्रमे तोटे यांनी 12 लाख 85 हजार व 17 लाख 900 रुपये घेतले होते.
तोटे यांनी ही मालमत्ता तारण ठेऊन एका बॅंकेकडून कर्ज घेतले. मात्र, त्यांना कर्जफेड करता न आल्याने बॅंकेने फिर्यादीच्या सदनिका ताब्यात घेतल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर जाधव व मोहिते यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अपहार व फसवणुकीचे गुन्हे दाखल झाल्याचे लक्षात आल्यावर तोटे दाम्पत्य तेथून गायब झाले. हे दाम्पत्य वारजे (पुणे) येथे असल्याची माहिती शिरवळ पोलीसांना मिळाली. गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यांना पुणे येथून शिताफीने अटक केली.