पुणे -दिवे (जाधववाडी, ता. पुरंदर) येथील ग्रीन मायक्रो न्यूट्रिशन प्रायव्हेट लिमिटेड या खत कंपनीच्या मालकाला पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुरंदर तालुक्यातील एका यू ट्युब चॅनलच्या प्रतिनिधीवर सासवड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 19) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश जगताप (रा. सासवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या यू ट्युब चॅनलच्या पत्रकाराचे नाव आहे. तर कंपनीचे मालक चंदन माणिकलाल शहा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, चंदन शहा यांची जाधववाडी येथे एव्हरग्रीन मायक्रो न्यूट्रिएन्ट नावाची खताची कंपनी आहे. गुरुवारी (दि. 15) या कंपनीत जगताप विनापरवाना फॅक्टरीमध्ये आला. आत येऊन त्याने कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे फोटो काढले. हे कामगार विनामास्क काम करीत आहेत.
याबाबत माझ्या यू ट्युब चॅनलवर बातमी लावणार आहे. बातमीमुळे होणारी बदनामी टाळायची असल्यास 5 लाख रुपये एकरकमी द्या, किंवा 20 हजार रुपये दरमहा याप्रमाणे पैसे द्या, अशी मागणी त्याने कंपनीचे व्यवस्थापक नरेश सिंग यांच्याकडे केली. त्यावर कंपनीच्या मालकांशी बोलतो असे सिंग यांनी सांगितले. त्यानंतर सिंग यांनी शहा यांना फोनकरून सगळी माहिती सांगितली. त्यानंतर सोमवारी (दि. 19) निलेश जगताप याने मॅनेजरला फोन करून दिवे येथील हॉटेल पेशवा येथे या असा निरोप दिला.
मालक शहा, त्यांचा मुलगा व व्यवस्थापक असे तिघेजण हॉटेल पेशवा येथे जगतापला भेटायला गेले. आम्ही आमची चूक सुधारू, असे मालकाने सांगितले. त्यावर “तुम्ही सुधारणा केल्यास माझा काय फायदा’ असा प्रश्न करून त्याने पुन्हा पैशांची मागणी केली.
मात्र, शहा यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असता तो तिथून रागाने निघून गेला. जाताना चॅनेलवर कंपनीची बदनामी करणारी बातमी देणार असल्याचेही तो म्हणाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करीत करीत आहेत.