शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहरातील रुग्ण सापडलेले प्रीतम प्रकाश नगर व महादेवनगर, विठ्ठलनगर, जोशीवाडी ही उपनगरे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले असल्याची माहिती शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे तर प्रीतम प्रकाश नगर मध्यवर्ती ठिकाण व महादेव नगर मध्यवर्ती ठिकाण धरून त्याच्या दोघांच्याही आसपासचा पाच किलोमीटरचा परिसर 30 मे पासून 14 दिवसांसाठी बफर क्षेत्र म्हणून जाहीर केला असल्याचेही रोकडे यांनी सांगितले. सदर चा आदेश शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिला आहे
दिल्लीवरून मांडवगण फराटा येथे आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील शिरूर येथील तरुणाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह तर मुंबई येथून वडिलांबरोबर आलेल्या प्रीतम प्रकाश नगर येथील कोरोना संशयित तरुणाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले. शिरूर येथील या दोंघाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह निघाल्याने शहराला दिलासा मिळाला आहे.
शिरूर शहरात काल मुंबईहून आलेल्या एका पुरुषाला तर एका 65 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली , त्यापैकी वृद्ध महिलेचा यात मृत्यू झाला आहे. यामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली होती परंतु आज शिरूर शहरात दोघांना कोरोना लागण झाली तरी परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे शिरूर शहरात नागरिक व्यापारी करोनाला भीत नाहीत असे दिसून आले आहे.
त्यात आज शिरुर नगर परिषद येते आमदार अशोक पवार, शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, शिरुर नगर परिषद सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यात आज बैठक झाली. यात शिरूर शहरातील कोरोना बाधित रुग्ण आढळलेले प्रीतम प्रकाशनगर, विठ्ठलनगर, महादेवनगर, जोशीवाडी हे उपनगरे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून ती सील केली आहेत. सदरचा आदेश शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिला आहे.
तर शिरूर शहरात मोठ्या प्रमाणात पारनेर, श्रीगोंदा, शिरूर तालुक्यातील इतर भागांतून खुलेआम नागरिक आपले चार चाकी वाहने घेऊन येत आहेत प्रशासनाचे यांच्यावर कुठलेही नियंत्रण दिसून येत नाही. शिरूर नगर परिषदेच्यावतीने प्रीतम प्रकाश नगर व महादेव नगर, विठ्ठलनगर, जोशीवाडी ही उपनगरे जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत त्याठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन करून ही उपनगरे सील करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
प्रीतम प्रकाश नगर येथे मुंबई वरून आलेला एक कोरोना बाधित रुग्ण आढळला असून त्याच्याबरोबर मुंबईवरून येणाऱ्या दोन जण, शिरूर येथे ज्या नातेवाईकाकडे आला होता त्या घरातील चार जण व त्यांचा जवळचा एक स्नेही असे सात जण तर महादेव नगर येथील मृत वृद्ध महिलेच्या संपर्कातील तीन जण नातेवाईक व शिरूर येथील एका हॉस्पिटलमध्ये 9 जण असे बारा असे दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेले 21 जणांना शिरूर येथील कोविड केअर सेंटर येथे आयसोलेशन क्वारटाईन करण्यात आले असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयांची वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली.