शिर्डी – श्री साईबाबा संस्थानतर्फे आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गुजरातसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
आज (सोमवार) उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाली. काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी वीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व वैद्यकीय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.
सकाळी 06.20 वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी 7 वा. श्री गुरुपौर्णिमेनिमित्त अध्यक्ष यार्लगड्डा व त्यांची पत्नी मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी 8 वा. यार्लगड्डा सपत्नीक, जिल्हाधिकारी सालीमठ सपत्नीक व पी. शिवा शंकर यांच्या हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधिवत पूजन करून ध्वज बदलण्यात आला. या वेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते.
दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी 4 ते सायं. 6 यावेळेत डॉ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर (आंबेगाव, पुणे) यांचे कीर्तन झाले. सायंकाळी 7 वा. श्रींची धुपारती झाली. सायं. 7.30 ते 10 या वेळेत विनीता बजाज, दुर्गा साई मंडळ, दिल्ली यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप स्टेजवर झाला. रात्री 9.15 वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. रात्री 10 ते पहाटे 5 यावेळेत समाधी मंदिरासमोरील स्टेजवर कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम झाला.
तसेच श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरिता खुले ठेवण्यात आले.
उद्या (मंगळवार) उत्सवाच्या सांगता दिनी पहाटे 5.05 वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी 6.50 वाजता श्रींची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होणार असून, सकाळी 10 वा. डॉ. प्रज्ञा देशपांडे-पळसोदकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी 12.10च्या दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती होणार असून, सायंकाळी 7 वाजता श्रींची धुपारती होईल. सायंकाळी 7.30 ते 9.30 यावेळेत संजीव कुमार (पुणे) यांचा भजनसंध्या भक्तिगीते कार्यक्रम होईल. रात्री 10 वा. श्रींची शेजारती होईल.