बाळासाहेब सोनवणे
राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सुरेश थोरात यांच्यात दुरंगी लढत होत आहे. मतदानाला अवघे चार दिवस बाकी राहिल्याने ना. विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सर्वच कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, धनश्री विखे पाटील, राजेंद्र विखे पाटील हे तिघे जण मतदारसंघात प्रत्येक गावात कॉर्नर सभा घेत आहेत. खासदार डॉ. सुजय विखे दक्षिणेची जबाबदारी सांभाळत आहेत.
परंतु ते राजकीय गणिते आखून शिर्डी मतदारसंघात ना. विखे पाटील यांना लाखापेक्षा जास्त मताधिक्य कसे मिळेल, यासाठी व्यूव्हरचना करीत आहेत. तालुक्यात विखे पाटील यांचे राजकीय विरोधक समजल्या जणाऱ्या अनेक नेत्यांना खा. विखे व ना. विखे पाटील यांनी एकत्र आणण्याचे काम केले आहे. यावेळी मतदारसंघात मोठ्या सभा रॅली न काढता प्रत्येक गावात विद्यमान सदस्यांना व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संवाद साधण्याकडे विखे कुटुंब भर देत आहे. प्रथमच ही राजकीय व्यूव्हरचना पहायला मिळाली.
ना. विखे पाटील यांच्या कुटुंबाकडे गेल्या 30 वर्षांपासून तालुक्याची सत्ता आहे. शिर्डी मतदारसंघात भाजपकडून ना. विखे पाटील, कॉंग्रेसकडून सुरेश थोरात, बहुजन वंचित आघाडीकडून विशाल कोळगे, बहुजन समाज पार्टीकडून सिमोन जगताप, अपक्ष म्हणून विश्वनाथ वाघ हे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदारसंघात ना. विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष नेहमीच राहिला आहे. तोही या निवडणुकीत पहायला मिळाला. मतदारसंघात कॉंग्रेसकडून आ. थोरात यांनी सुरेश थोरात यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले आहे. तेही कार्यकर्त्यांसह मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांचा भर मतदारसंघाचा विकास करणार, यावर भर आहे. थोरात यांच्या उमेदवारीमुळे ही लढत चांगलीच रंगतदार बनली आहे.