लोणी धामणी, (वार्ताहर) – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी शेकडो वर्षांची परंपरा जपत धुलीवंदन सण उत्साहात साजरा केला आहे. तालुक्यातील हे छोटंसं व टुमदार गाव. येथील धुलिवंदन हा सण गावच्या पारंपरिक वैभवात भर घालणारा आहे. या सणाला गावातील लहान मुलं, शाळकरी मुलं तर यावर्षी काही तरुण मंडळींनी यात सहभागी होऊन या सणाला आनंद द्विगुणित करतात.
या वर्षी चाफ्याची फुले,हार,साडीने केलेली सजावट ,डोक्यावर फेटा आणि हातात वीर देवाची काठी आणि वीर देव अशी सजावट करून ही मिरवणूक गावच्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात आणली गेली. त्या ठिकाणी महिलांनी पाण्याचे हेल घालून तयार गेलेला गोलाकार फेरा धरून सर्व वीर देव नाचले. त्यांच्या बरोबरीने गावातील जेष्ठ मंडळीनी घाई धरून सनई आणि ताशाच्या तालावर फेरा धरला.
त्यानंतर ही मिरवणूक महादेव मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा चौकात आणली गेली. त्याठिकाणी अनेक तरुण, जेष्ठ मंडळी यात सहभागी होऊन या सणाला आनंद घेतला. यावर्षी विद्यमान उपसरपंच बिपीन चौधरी,गणेश तांबे,बाळासाहेब रणपिसे हे मंडळी वीर देवाच्या वेशात येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेकडो वर्षांची परंपरा असलेला आमचा हा कार्यक्रम आम्ही अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्न करत असतो. सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य असते असे माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.