वाघोली – शिरसवडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश बाळासाहेब गावडे यांनी ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. 30 मार्च रोजी बहुमताने ठराव घेऊन शिरसवडी येथील एका कंपनीचा पाणीपुरवठा बंद केलेला असताना ग्रामसेवक यांनी कुठलाही लेखी आदेश नसताना व कोणालाही विचारत न घेता कंपनीचा बंद असलेला पाणीपुरवठा चालू केल्याबद्दल निषेध नोंदवत गावडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी मंगेश गावडे यांना लेखी पत्राद्वारे राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. या पत्रात ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली यांच्या वतीने कंपनीचे पाणी चालू करण्याबाबत कोणताही लेखी अथवा तोंडी आदेश दिलेला नसल्याचे गावडे यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी व कंपनीचे कर्मचारी यांनी संगनमत करून पाणीपुरवठा चालू केला असून या कामी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यास लेखी खुलासा सादर करणे बाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्याने ग्रामपंचायत कुलपाचे सील तोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान करून बेकायदेशीरपणे पाणीपुरठा चालू केला आला असल्याचे निदर्शनास आल्याने लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल असे पत्रात नमूद केले आहे.
ग्रामपंचायतीचा टॅक्स संबंधित कंपनीकडून एक कोटी 97 लाख रुपये च्या आसपास भरणे बाकी आहे. यासंदर्भात कंपनीने टॅक्स भरणा केला नसल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने ठराव करून पाणी बंद करण्यात आले होते. याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्यात आली आहे. कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने पुढील योग्य ते निर्णय घेण्यात येणार आहेत.
सुनील मुटेकर ग्रामसेवक, शिरसवडी