पुणे : शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पुण्यात अद्याप शिंदे गटाला उघड-उघड कोणीही पाठिंबा दिलेला नव्हता. मात्र, शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ज्येष्ठ नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा गट जाणार आह. या गटाला थेट विधान परिषदवर आमदार पदाची संधी अथवा राज्यातील महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी काही माजी नगरसेवक मुंबईत ठिय्या मांडून आहेत. उद्या ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांनी या नगरसेवकांना चर्चेसाठी बोलविले आहे. त्यामुळे, अगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट शिवसेनेला धक्का देणार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडानंतर भाजपशी हातमिळवणी करत राज्यात भाजप-शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. मात्र, शिंदे यांच्या बंडानंतर उद्बवलेल्या राजकीय स्थितीत त्यांच्या पाठिशी पुण्यातील सेनेची ताकद किती होती, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. गेल्या अडीच वर्षात शिंदे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यक्रम, विकासकामांच्या माध्यमातून ताकद देण्याचे काम केले. त्यामुळे, शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी हडपसर भागातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांना शिंदे यांनी मुंबईत पाचारण केले आहे.
महापालिका निवडणूकांच्या तोंडावर शहरात अद्याप थेट कोणी शिंदे गटला पाठिंबा दिलेला नसला तरी भानगिरे यांच्या माध्यमातून शिंदे गटाची ताकद शहरात वाढविली जाणार आहे. भानगिरे यांचा जनसंपर्क या भागात दांडगा असल्याने त्याचा फायदा शिंदे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघ, हडपसर तसेच पुरंदर मतदारसंघासाठी होणार आहे. विशेष म्हणजे पुरंदरचे शिवसेनेचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही शिवसेनेशी दोनच दिवसांपूर्वी फारकत घेत शिंदे गटाला उघडपणे जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदे गट आता पुणे शहर तसेच जिल्ह्यात ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट दिसते.
“एकनाथ शिंदे’ नावाने उद्यान…
भानगिरे यांनी त्यांच्या नगरसेवकपदाच्या कार्यकाळात “एकनाथ शिंदे’ या नावाने उद्यान उभारले आहे. राज्यातील राजकीय घडामोडीच्या काळात ते शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यामुळे मुख्यमंत्र्याबरोबर असलेल्या या जुन्या ऋणानुबंधामुळे त्यांना विधान परिषदेवर संधी मिळू शकतो, अशी चर्चा शहरात आहे. तसे झाल्यास त्याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकीत आणि त्यापुढे शिरूर लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला आणि त्यांच्या समर्थकांना होऊ शकतो. भानगिरे यांच्यावर शहर तसेच एखादे प्रमुख महामंडळही दिले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.