लोणी काळभोर – थेऊर ( ता. हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत १६ ते १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या करून मृतदेह टाकल्याचे आढळून आले आहे. चिंतामणी हायस्कूलच्या समोरील कारखान्याच्या मोकळ्या जागेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलीची ओळख अद्यापही पटलेली नाही.
थेऊर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत आज मंगळवारी ( दि. ५ ) पहाटे काही नागरिकांना संबंधित मुलीचा मृतदेह आढळून आला मृतदेह पाहिल्यानंतर नागरिकांनी तातडीने ही बाब लोणी काळभोर पोलिसांना कळविली.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. तसेच घटनास्थळी श्वान पथकही दाखल झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.