मुंबई – राज कुंद्रा यांना अश्लील चित्रफितींच्या निर्मितीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने एक निवेदन जारी केले असून त्यात तिने म्हटले आहे की, लोकांनी माझ्या कुटुंबाची प्रायव्हसी जपली पाहिजे, आम्हाला मुले आहेत त्यांच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहे.
या प्रकरणात न्यायालयाला त्यांचे काम करू दिले पाहिजे, त्यांचा जो काही निर्णय होईल तो होऊ दिला पाहिजे, त्यासाठी आमच्यावर सध्या जी मीडिया ट्रायल सुरू आहे त्याला प्रतिबंध घातला गेला पाहिजे, असेही तिने म्हटले आहे.
शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर आपली ही भूमिका व्यक्त केली आहे. मुंबई पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे, असेही तिने यात नमूद केले आहे. एक कुटुंब या नात्याने आम्ही या प्रकरणात कायदेशीर मदत घेत आहोत. पण आमच्या मुलांची आई या नात्याने मी एक नम्र विनंती करू इच्छिते की, आमच्या मुलांच्या हितासाठी आमची प्रायव्हसी जपली जावी, आमच्याविषयी ऐकीव माहितीवर आधारित कोणतीही माहिती प्रसारित केली जाऊ नये.
आमच्याविषयी कोणत्याही माहितीची शहानिशा केल्याशिवाय काहीही प्रसारित होता कामा नये अशी आपली विनंती आहे असेही तिने म्हटले आहे. शिल्पा शेट्टीविषयी या प्रकरणात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी तिच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली होती, पण कोर्टाने तसा आदेश जारी करण्यास नकार दिल्यानंतर शिल्पाने इन्स्टाग्रामवर हे निवेदन जारी केले आहे.
मी कायदा पाळणारी नागरिक असून मी गेली 29 वर्षे प्रचंड मेहनत घेऊन चित्रपटसृष्टीत नाव कमावले आहे, असेही शिल्पाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. अनेकांनी माझ्यावर विश्वास ठेवला पण मी आजवर कधीही कोणाचा विश्वासघात केला नाही.
आमच्या प्रकरणात न्यायालयाला त्यांचे काम पूर्ण करू द्या, आमच्याविषयीची मीडिया ट्रायल थांबवा, अशी विनंतीही तिने यात केली आहे. आमच्यावर बेफाम आरोप केले जात असून अनेक अफवाही पसरवल्या जात आहेत अशीही तिची तक्रार आहे.