Shilpa Shetty and Raj Kundra| अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तिच्या फिटनेसमुळे ती अधिक ओळखली जाते. मात्र अनेकदा शिल्पाला तिचा पती राज कुंद्रा याच्यावरून ट्रोल केले जाते. तो एक उद्योगपती असल्याने शिल्पाने राजशी पैशांसाठी लग्न केल्याची टीका अनेकदा तिच्यावर केली जाते. मात्र एका मुलाखतीदरम्यान तिने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
‘झूम’ ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान शिल्पा म्हणाली की, “जेव्हा मी राजशी लग्न केले तेव्हा गुगलच्या मते तो १०८ वा सर्वात तरुण किंवा सर्वात श्रीमंत ब्रिटिश भारतीय होता, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्यावेळी गुगलवर शिल्पाबद्दल माहिती काढायले लोक विसरले, जी स्वत:ही श्रीमंत होती. मी आता अजून जास्त श्रीमंत झाले आहे आणि माझे सर्व आयकर, जीएसटी बिलं भरते. राजपेक्षाही अनेक श्रीमंत मुलांनी मला लग्नासाठी विचारले होते. ”
शिल्पा पुढे म्हणाली, “राज श्रीमंत होता म्हणून मी त्याच्याशी लग्न केलं नाही, कारण पैसा माझ्यासाठी कधीच महत्त्वाचा नव्हता. तो माणूस म्हणून कसा आहे हे जाणून घेतल्यानंतर मी लग्न केलं. जर त्याच्याकडे पैसे असते, पण तो चांगला माणूस नसता तर मी त्याच्याशी लग्न केलं नसतं. मी माझ्या खूप चांगल्या मित्राशी लग्न केलं आहे. एक यशस्वी महिला तिच्या जोडीदारामध्ये फक्त पैसा शोधत नाही,” असेही शिल्पा म्हणाली.
दरम्यान, शिल्पाने 2009 मध्ये राज कुंद्राशी विवाह करत लग्नगाठ बांधली. तिला समिशा आणि विहान ही दोन मुले आहेत. याआधी राज कुंद्राने 2003 मध्ये कविता कुंद्राशी लग्न केलं होते, पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही.