शेवगाव : युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष कदम यांनी जाहीर केलेली कार्यकारिणीच योग्य

शेवगाव (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी जाहीर केलेली युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी नगर दक्षिणचे भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी रद्द केल्याच्या  तीव्र प्रतिक्रिया येथे उमटल्या आहेत. युवा मोर्चाचे माजी उपजिल्हाध्यक्ष अमोल घोलप यांनी त्या विरूध्द आघाडी उघडली आहे. युवा मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष  कदम यांनी जाहीर केलेली कार्यकारिणीच अस्तित्वात रहावी,  यासाठी त्यांनी एक हजार पत्र पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठांकडे पाठविण्याचा चंग बांधला आहे . 

घोलप यांनी भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या, प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांना पाठविलेल्या पत्रात जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा पदाची धुरा सांभाळताच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून अत्यंत चांगल्या प्रकारे युवकांची फळी जिल्ह्यात निर्माण केली आहे .

मुळात सत्यजित कदम हे खूप संघर्षमय नेतृत्व असून युवा मोर्चा हे पार्टीचे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे. त्यांनी अत्यंत दूरदर्शीपणे निर्माण केलेल्या युवकांची फळी अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे  तर राज्यात व संपूर्ण देशात जिल्ह्याचे नाव रोशन करील  याचा मला पूर्ण विश्वास आहे. तेव्हा त्यांनी केलेली कार्यकारणी योग्य असून तीच कायम ठेवावी, असे म्हटले असून वेळप्रसंगी त्यासाठी नाईलाजाने आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब करावा  लागेल  असेही नमूद करण्यात आले आहे .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.