नटीला वाय सुरक्षा, मग हाथसरच्या कुटुंबाला का नाही?

मुंबई – मुंबईत आपल्या घरात बेकायदा बांधकाम करणाऱ्या एका नटीला केंद्र सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली जाते; पण हाथरसमधील पीडित मुलीच्या कुटुंबाला का संरक्षण दिले जात नाही, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

या कुटुंबाला रोज धमकावले जात आहे, हे कुटुंब सध्या दहशतीच्या छायेत आहे त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याच्या मागणी केली तर त्यात काय चूक आहे, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात हा सवाल करण्यात आला आहे. हाथरसच्या घटनेने अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटे गळून पडले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली असताना या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची घोषणा योगींनी का केली, असा सवालही शिवसेनेने यात केला आहे.

योगी सरकारने या मुलीचा मध्यरात्री अंत्यविधी करून या प्रकरणाचा सारा पुरावाच नष्ट करून टाकला आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीत नेमके काय हाती लागेल हा घोळच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुशांतसिंह याच्या प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा खड्डा ज्यांनी रचला त्याच खड्ड्यात ते पडले, अशी टिप्पणी करून शिवसेनेने म्हटले आहे की, हाथरस प्रकरणात त्या सरकारने लपवालपवी करण्याचा प्रयत्न केला नसता तर हे प्रकरण इतके चिघळले नसते. उत्तर प्रदेशच्या सर्वच मंत्र्यांनी पीडितेच्या घरी जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.