मुंबई – अभिनेत्री शहनाज गिलला ‘बिग बॉस 16’ पासून मोठी प्रसिद्धी मिळाली. या शोद्वारे तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. साध्या-सरळ स्वभावामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. मात्र बिग बॉसनंतर शहनाजने स्वत:मध्ये खूप बदल केला. अनेकदा शहनाजला जाड शरीरामुळे ट्रोल केलं जात होतं. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने बॉडी शेमिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे.
शहनाज म्हणाली, “मी स्वतःला प्रचंड बदललं आहे. मी स्वतःवर काम केलं आहे. मला ज्या लोकांनी उत्तम सल्ले दिले त्यानुसार मी काम केलं आणि स्वतःला सुधारलं. मी वजन कमी केलं, कारण बिग बॉसमध्ये असताना माझ्यावर बॉडी शेमिंगसारख्या कमेंट करण्यात आल्या होत्या. लोकांची समज मी बदलली आहे. अनेकांना वाटत होते की मी फक्त सलवार सूट घालू शकते. पण आता मी पुढे जात आहे.”
दरम्यान, शहनाज दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘बिग बॉस’च्या घरात देखील या दोघांची जोडी अनेकांच्या पसंतीस पडली होती. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. मात्र स्वत:ला सावरत तिने कमी कालावधीतच मोठे यश संपादन केले आहे. शहनाज हिने तिच्या करियरची सुरुवात 2017 पासून केली. ती एक गायिकाही आहे.
अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून शहनाज हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या सिनेमासाठी तिने मोठी मेहनत घेतली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शहनाज आणि राघव जुयाल यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. या दोघांनी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.