बारामती – भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा ज्या दिवशी बारामतीत येईल त्या दिवशी या यात्रेत मेंढ्या घुसवून निषेध केला जाईल, असा इशारा धनगर आरक्षण युवा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. गुरुवारी (दि. 29) याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, हे निवेदन नायाब तहसीलदार भक्ती देवकाते यांनी स्वीकारले.
देवेंद्र फडणवीस यांनीच बारामतीत धनगर बांधवांना आरक्षणाचा शब्द दिला होता. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे जाहीर केले होते. आता पाच वर्षे उलटूनही आरक्षण मिळालेले नाही, पाच वर्षांत मंत्रिमंडळाच्या 240 बैठका होऊनही अद्याप धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. योजना नको एसटीचे सर्टिफिकेट द्या, अशी मागणी या समितीच्या वतीने करण्यात आली आहे. एसटीचे आरक्षण मिळाले की सर्व सवलती आपोआपच मिळतील, असेही निवेदनात नमूद केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनीच बारामतीत येत आरक्षणाचा शब्द देत आंदोलन संपविले होते;मात्र पाच वर्षांत त्यांनी काहीही केले नाही. बारामतीत येताना तुमच्या पक्षातील भाजपच्या एखाद्या धनगर समाजातील पदाधिकाऱ्यांचे एसटीचे सर्टिफिकेट आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे घेऊन आला नाही तर आम्ही आपल्या महाजनादेश यात्रेत शेळ्या मेंढ्यांसह निषेध आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर बापूराव सोलनकर, गणपत देवकाते, अविनाश भिसे, माणिक काळे, तानाजी कोळेकर, सूरज खोमणे, तुषार कोकरे, सचिन सोलनकर, विजय गावडे, संग्राम झारगड, पंकज देवकाते, आबा टकले, अरविंद देवकाते, महेश गावडे, दिलीप नाळे, साधू बल्लाळ, रणजित वाघ यांच्या सह्या आहेत.