बोहल्यावर चढण्यापूर्वीच तिने केली आत्महत्या

पिंपरी – घरातील सर्वांच्या लाडक्‍या मुलीचे लग्न ठरल्यामुळे सर्वजण आनंदित होते. होणाऱ्या पतीसह सर्वचजण तिचे लाड पुरवित होते. मात्र गळ्यात मंगळसूत्र घालण्यापूर्वीच तिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

दिव्या आबासाहेब राजेभोसले (वय 17, सध्या रा. फुगेवस्ती, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या ही आपले मामा देवीदास त्र्यंबकराव जाधव यांच्या घरी चार दिवसांपूर्वी आली होती. मामी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यावेळी दिव्या हिचे आजोबा आणि मामाची लहान मुलगी हे दोघेच घरी होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मामी घरी आली. तिने दिव्या असलेल्या खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दिव्याने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. दिव्या हिला त्वरीत रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

दिव्या ही अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्‍यातील मुंगी या गावात आपल्या कुटूंबासह राहत होती. अकरावी पास झाल्यावर तिने शिक्षण सोडले होते. काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न ठरले होते. यामुळे सुपारी फोडण्याचाही कार्यक्रम झाला होता. लग्नाच्या पुढील बोलाचाली आणि तारीख काढण्यासाठी दिव्याचे वडील वरपक्षाकडे गेले होते. काही दिवसातच दिव्याचे लग्न होणार असल्याने कुटूंबात तिचे सर्वजण लाड करीत होते. तिच्या भावी पतीनेही तिला नुकताच मोबाईल आणि ड्रेस घेऊन दिला होता. यामुळे तासन्‌तास ती भावी पतीशी गप्पा मारत होती. मात्र अज्ञात कारणास्तव दिव्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.