मुंबई- एचडीएफसीचे एचडीएफसी बॅंकेत विलीनीकरण करण्याची घोषणा काल झाल्यानंतर या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या भावात काल दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. मात्र मंगळवारी शेअर बाजारात नफेखोरीचे वातावरण होते. याचा फटका या दोन्ही कंपन्यांना बसला.
मंगळवारी एचडीएफसी कंपनीच्या शेअरचा भाव 2.6 टक्क्यांनी कमी झाला. तर एचडीएफसी बॅंकेच्या शेअरचा भाव तीन टक्क्यांनी कमी झाला असल्याचे दिसून आले. यासंदर्भात विश्लेषकांनी सांगितले की, काल विलीनीकरनाची घोषणा झाल्यानंतर बऱ्याच गुंतवणूकदारांनी घाईगडबडीत शेअर खरेदी केले.
मात्र हे विलीनीकरण पूर्ण होण्यास आणखी बराच कालावधी लागणार आहे हे गुंतवणूकदारांच्या ध्यानात आल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी आज शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. आता विलीनीकरणानंतर एचडीएफसी बॅंक ही जगातील सर्वात मोठ्या काही बॅंकांपैकी एक बॅंक होणार आहे. त्यामुळे या बॅंकेची कर्ज वितरणाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.