Sharad pawar-Ajit pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी अखेर दिवाळीनिमित्त गोविंद बागेत हजेरी लावली. त्यानंतर भाऊबीजेनिमित्त खुद्द शरद पवार (shard pawar) अजित पवारांच्या घरी गेले. त्यांच्या या भेटीगाठीवर अजितदादा गटाचे नेते तसेच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (anil patil) यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
‘शरद पवार आणि अजित पवार दिवाळीनिमित्त एकत्र आले आहेत. काही दिवसांत गोड बातमी मिळू शकते, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे आहे’, असे अनिल पाटील म्हणाले आहेत. राज्यात 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मोठी घडणार का? अजित पवार व शरद पवार एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल पाटील पुढे म्हणाले, काही विरोधात बसलेले आमदार सातत्याने पश्चात्ताप करत आहेत. आम्ही कुठून या बाजूला राहिलेलो आहोत, अशी खंत ते खासगीत व्यक्त करत आहेत. ठाकरे गटाचे असू द्या नाहीतर शरद पवार गटाचे. म्हणून अधिवेशनाआधी किंवा अधिवेशन संपल्यानंतर चांगली बातमी कानावर येऊ शकते, असे माझे वैयक्तिक मत आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षात असलेल्या आमदारांना पश्चाताप झाला आहे. आम्ही या बाजूला का राहिलो? असा पश्चात्ताप त्यांना होतोय. त्यांच्या बोलण्याहून मला अंदाज येत आहे, असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे.
संजय राऊतांना राजकीय मलेरिया
बारामतीचे मैदान शरद पवारच जिंकणार. पुढील निवडणुकीत शरद पवार अजित पवारांना धूळ चारणार, असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरुन अनिल पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली. अनिल पाटील म्हणाले, संजय राऊत यांना राजकीय मलेरिया झाला आहे. त्यांना अजित पवारांवर असे बोलण्याची सवयच आहे.
काका-पुतण्याच्या भेटीगाठी
शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये गेल्या आठवड्यात दिवाळीनिमित्त पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला गेले. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून अजितदादांच्या नाराजीच्या बातम्याही सातत्याने येत आहेत.
विशेष म्हणजे शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग निवासस्थानी देखील अजित पवारांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर अजित पवारांच्या निवास्थानी आज शरद पवार गेले होते. भाऊबीजच्या निमित्ताने शरद पवार अजित पवारांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे हे शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.