गृहमंत्री अनिल देशमुख : पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे व्याख्यानमाला
पुणे – “राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शिक्षण, क्रीडा या क्षेत्रांमध्ये शरदचंद्र पवार यांचे उत्तुंग कार्य आहे. याची आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील दखल घेतली गेली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य संपूर्ण समाज घटकासाठी विशेषतः युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित शारदा व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव लक्ष्मणराव पवार, सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ऍड. संदीप कदम यांनी सर्वप्रथम शारदा व्याख्यानमाला आयोजनाचे उद्देश, संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले. तसेच शरदचंद्र पवार यांचे संघटन कौशल्य, अभ्यासवृत्ती, संघर्षशीलता, स्मरणशक्ती, संयम, प्रशासनावरील पकड, नेतृत्वगुण इत्यादी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूवर थोडक्यात प्रकाश टाकला.
व्याख्यानमालेचे “नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरणाचा ढाचा व दृष्टिकोन निराळा असून, त्याची तत्वेदेखील दिली आहेत. त्यामुळे चौकटीत अडकून न राहता तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. व्याख्यानानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सहज व सोप्या भाषेत उत्तरे देत त्यांचे शंकानिरसन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर, तर आभार लक्ष्मणराव पवार यांनी मानले. डॉ. राजेंद्र देशपांडे यांनी “प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. अशोक भोसले, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्राचार्य डॉ. तानाजी साळवे, प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, प्राचार्या डॉ. रागिनी पाटील, प्राचार्या डॉ. सुषमा भोसले, प्राचार्या डॉ. शर्मीला चौधरी आदींनी पुढाकार घेतला.