बारामती/ जळोची – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिवाळीनिमित्त बारामतीत आले आहेत. दिवाळी सणादरम्यान पवार हे गोविंदबाग येथील निवासस्थानी नागरिकांना भेटत असतात. मागील दोन दिवसांपासून पवार बारामतीत आहेत. ते नागरिकांना भेटत आहेत. रविवार (दि.12) सकाळपासून त्यांना भेटण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक येत आहेत.
दरम्यान, शनिवार (दि.11) विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान त्यांना अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. त्यानंतर त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले. सुळे यांनी तत्काळ येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांच्यामार्फत तपासणी केली. सततचे कार्यक्रम व प्रवासामुळे त्यांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पुन्हा पवारांना नागरिक भेटत आहेत.
दिवाळीनिमित्त शरद पवारांसह पवार कुटुंबीय बारामतीत असतात. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक बारामतीत येत असतात. पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत हस्तांदोलन करून त्यांच्यासमवेत फोटो घेण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यासाठी झुंबड उडत असते. पवार हे आपुलकीने येणाऱ्या प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारून व शुभेच्छा देतात.
त्यामुळे बारामतीत पवार कुटुंबीय आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दिवाळी पाडवा भेट हा आपुलकीचा ठेवा बनला आहे. दरम्यान, शरद पवारांची अचानक प्रकृती बिघडली होती. यावर सुळे म्हणाल्या की, तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद महाराष्ट्रातील व बारामती सह महाराष्ट्रातील तसेच देशातील मायबाप जनता हेच पवार साहेबांचे टॉनिक आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.