मधुकर गलांडे
बिजवडी – राज्याचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरला जरी सुरु झाला आसला तरी पुणे जिल्यातील साखर कारखान्यांकडे अजून पाहिजे तेवढा ऊसतोड मजूर न आल्याने साखर कारखान्यांची गाळपाची चाके मंदावली असल्याचे दिसत आहे. आता दिवाळीच्या सणानंतरच साखर कारखाने वेगाने चालतील असे चित्र सध्या पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यावर पाहावयास मिळत आहे.
या वर्षीचा गाळप हंगाम हा कमी दिवसाचा असल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत. गाळप हंगाम हा कमीत कमी 90 दिवसच चालेल असा अंदाज आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 17 साखर कारखाने आहेत. यापैकी जवळपास 11 कारखाने हे सहकारी आहेत. 6 कारखाने हे खासगी आहेत. त्यातील इंदापूर, बारामती, शिरूर, तीन तीन कारखाने तर दौंड चार, भोर, जुन्नर, मुळाशी आंबेगाव प्रत्येकी एकएक साखर कारखाना आहे. या सर्व कारखान्यावर अजूनही मजूर आला नाही. त्यामुळे गाळप हे संथ गतीने सुरू आहे.
शेजारील राज्यातील गुजरातमध्ये गाळप हंगाम हा महाराष्ट्रापेक्षा 15 दिवस अगोदर सुरू होत असल्याने आणि ऊसतोडणीच्या आणि वाहतुकीमध्ये मजुराची मजुरीही महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्याने बाहेरच्या राज्यात जाणे पसंत करत आहेत. त्यामुळे वरचेवर महाराष्ट्रात ऊसतोड मजूर येण्याचे टाळत असल्याचे दिसत आहे. ज्या भागातून मजूर येतात त्या भागातील पेरण्याचा हंगाम जर चांगला असेल तरीही ते उशिराच येतात. त्यामुळे हा हंगाम दिवाळीनंतर जोरात सुरू होणार आहे.
मानवनिर्मित टंचाई
साखर धंद्यात आता मोठी अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे. यात भांडवलदार राजकारण्यांची मक्तेदारी होऊन बसली आहे. जे राज्यसरकारमध्ये बसून सहकार आणि साखर धोरण ठरवतात, त्यांचेच खासगी साखर कारखाने सर्वाधिक आहेत. त्यामुळे यात खासगी विरुद्ध सहकार अशी आपसातच मोठी स्पर्धा आहे. जो साखर कारखाना जास्त उचल देईल, त्या कारखान्याकडे मजूर जास्त जातात. यात आता खासगी साखर कारखान्याचे मालक खासगी धोरण राबून मजुरांना उचल देतात.
तर न आलेल्या मजुरांकडून वसुलीही त्याच पद्धतीने केली जाते. त्यामुळे त्यांची उचल बुडण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र सहकाराला काही बंधने असल्याने त्यांना शासनाचे धोरणा प्रमाणेच चालावे लागते. यात मुकादम हा या कारखान्याच्या गाळप हांगामाचा मुख्य सूत्रधार होऊन बसला आहे. हे मुकादम एका कारखान्या पेक्षा जास्त कारखान्याकडे करार करतात. त्यांच्याकडील उचली घेतात आणि एकाच कारखान्याला कामगार पुरवतात. मग हे मुकादम इतर कारखान्यांची फसवणूक करतात.
परराज्यातील मजुरांवरच अवलंबून
आपल्याकडे ऊस गाळप हंगामासाठी पूर्वी जो मजूर वर्ग येत होता तो बीड, जालना, लातूर या भागातून जास्त प्रमाणात येत होता. आता मात्र या भागातील ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्रात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आणि मजुरांची संख्याही वरचे वर घटत चालली आहे. तर आता आपल्या भागात मध्यप्रदेश आणि आदिवासी भागातील मजुरांची अजून तरी हजेरी चांगली आहे. त्यामुळे आता ऊस गाळप हंगाम हा परराज्यातील मजुरावरच आधारित चालला आहे.