मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला हजर राहिलेल्या 3 आमदारांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे हे तिन्ही आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नव्या गटात जाण्याची शक्यता वाढली आहे. असे झाले तर पक्षातील पडझड थांबवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, हडपसरचे आमदार चेतन तुपे व विक्रमगढचे आमदार सुनील भुसारा यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत राहणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. हे तिघेही शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीलाही उपस्थित होते. पण आता या तिघांनीही अजित पवार यांची भेट घेतल्यामुळे विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपरोक्त 3 आमदारांपैकी राजेश टोपे व सुनील भुसारा यांनी गुरुवारी रात्री उशीरा देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली. तर आमदार चेतन तुपे शुक्रवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर पोहोचले.
या तिन्ही आमदारांनी अजित पवारांची नेमकी काय चर्चा केली? याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. पण या भेटीत सरकारमध्ये सहभागी होण्याच्या मुद्यावर अजित पवारांनी त्यांना काही आश्वासन दिले का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.