नागपूर – भारताला सशक्त आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार हे एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देतील, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. गेल्या आठवड्यात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केले आहे. बावनकुळे म्हणाले, एका कुटुंबातील दोन लोक भेटले, तर त्याला राजकीय समजू नये. तसेच, शरद पवार एकदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करतील.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, त्याची वाट पाहावी लागते. जरी आज शरद पवार हे मोदींचे नेतृत्व मान्य करत नसले तरी काळ बदलतो. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात असल्याचा विचार शरद पवार एक ना एक दिवस करतील. यानंतर शरद पवारांमध्ये परिवर्तन झालेले आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही जोर-जबरदस्ती करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी भाजपाला राष्ट्र निर्माणाकरिता पाठिंबा दिला आहे. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी ते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. शिंदेंच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस, अजित पवार राज्यभर फिरत आहेत, असेही बावनकुळेंनी सांगितले.